जेजे उत्तम तेच पहा
अन् बोला ऐका करा
आयुष्याचा मार्ग दाविला
सचोटीचा अन् पूर्ण खरा
मुली म्हणून कधी आम्हाला
कोंडून ठेवलं नाहीत घरी
म्हणालात बाळा भरपूर शिक
स्वबळावर घे भरारी
कला श्रमांचे नेहमीच कौतुक
कुणीही असो आपले परके
धडपडणा-या प्रत्येकाला
म्हणूनच वाटता तुम्ही सख्खे
कित्येक व्यक्तींची काढलेली
जणू सजीव, चित्र सुरेख
सुवाच्य नेटकं प्रामाणिक काम
हीच तुमच्या यशाची मेख
माणस जोडण्याचा छंद तुमचा
जीवापाड जपली नाती
प्रत्येक ठिकाणी तुम्ही उघडली
कैक मैत्रीची खाती
तुम्ही म्हणजे खरं सांगू बाबा?
गोड सुरांंचा खळाळता झरा
निर्मळ मन तीक्ष्ण बुद्धी
कलापैलुंनी सजलेला हिरा